जिल्ह्याचा इतिहास

सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंतराजे हे करतात.

विशेष हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले.

औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते नाना पाटील यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.

संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्‍न करत आहे.

सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे.

नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र – मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.

ऐतिहासिक महत्त्वाचे

प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात.

प्रागैतिहासिक कालखंड -

प्राचीन कालखंडापासूनचे मानवी अस्तित्वाचे पुरावे सांगली, सातारा भागात विशेषत: नद्यांच्या खोऱ्यात आढळले आहेत. त्यावरून प्राचीन काळापासून येथे मानवी वसाहतीचे अस्तित्व होते, हे स्पष्ट होते.

प्राचीन राजसत्तांचा कालखंड -

सांगली जिल्हा व परिसरात मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, साम्राज्याच्या, अधिपत्याखाली होता. त्या काळातील ताम्रपटावरून सांगली जिल्ह्यातील शहराचे संदर्भ सापडतात.

मराठी राज्यांचा कालखंड -

मराठी साम्राज्यात येण्यापूर्वी सांगली जिल्ह्याचा भाग विजापूरच्या आदिलशाहीत समाविष्ट होता. छत्रपती शिवरायांचे सरनोबत नेताजी पालकर यांनी १६६९ साली आदिलशाहाकडून सांगली, मिरज, ब्रम्हणाळ जिंकून घेतले. १९७२ साली थोरल्या माधवराव पेशव्यांनी गोविंदराव पटवर्धनाना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर जहागीर म्हणून दिला.

परशुराम पटवर्धन यांच्या निधनानंतर मिरज जहागिरीची वाटणी होऊन सांगली हे नवीन सत्ताकेंद्र तयार झाले.

स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड - (उत्तुंग क्रांतीगाथा)

सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील शिराळा तालुक्यातील बिळाशी सत्याग्रहाची नोंद भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात झालेली आहे

विठोजीराव चव्हाण यांनी औरंगजेबाच्या उरत धडकी भरवली होती.

वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे क्रांतिकारक याच सांगली जिल्ह्याचे सुपुत्र होते.

क्रांतिपर्वाचे अग्रणी -

कुंडलचे जी.डी.बापू लाड, वाळव्याचे नागनाथ आण्णा नायकवडी, येडेनिपाणीचे पांडू मास्तर, येडेमच्छिंद्र चे क्रांतिसिंह नाना पाटील, वाटेगावचे बर्डे गुरुजी यांच्यासह बाबुराव चरणकर, धोंडीराम माळी, नाथाजी लाड, गौरीहर सिंहासने, बाबूजी पाटणकर, जोशीकाका हे स्वातंत्र्य लढ्यात अग्रस्थानी होते

महत्वाची कामगिरी -

सरकारी इमारती जाळणे

पे स्पेशल हि पैसे घेवून जाणारी रेल्वे लुटली

शेणोली स्टेशन जाळले

चरणची चावडी लुटली

शिराळ्यात प्रतिसरकार स्थापन केले.

बलिदान -

इस्लामपूरच्या मोर्च्यात सहभागी झालेले इंजिनिअर पांडे यांच्यावर इंग्रज पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडली.

वसंतदादा पाटील यांच्यासोबत तुरुंग फोडून पलायन करताना अण्णा पत्रावळे यांनी बलिदान दिले

कृष्णामाईची साथ -

पद्माळेचे तरुण क्रांतीकारक वसंतदादा पाटील यांनी सांगलीचा तुरुंग फोडून कृष्णेच्या पुरात उडी घेतली व पोहत जाऊन गोळीने जखमी असतानाही पैलतीर गाठला.

हेच वसंतदादा पाटील पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व जिल्ह्याच्याच नाही तर राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात छाप त्यांनी उमटवली

पत्री सरकार -

समांतर सरकारचे 'पत्री' सरकार असे नामकरण होण्याचे कारण म्हणजे या सरकारच्या व क्रांतिकारकांच्या विरोधात गद्दारी करणाऱ्यास पायात पत्र्याचे खिळे ठोकण्याची शिक्षा दिली जायची. त्यामुळेच प्रतिसरकारचा पत्री सरकार असाही उल्लेख आढळतो. पत्री सरकारच्या माध्यमातून क्रांतीसिंहानी साडेतीन वर्षाहून अधिक काळ इंग्रजांना धडकी भरवली होती.